गडचिरोलीत दहा हजार क्विंटल धान गैरव्यवहार   

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ५ जणांना अटक

गडचिरोली : देऊळगाव  खरेदी केंद्रात झालेल्या दहा हजार क्विंटल धान  गैरव्यवहारप्रकरणी ५ संचालकांना कुरखेडा पोलिसांनी रविवारी अटक केली. धान गैरव्यवहार प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून, आता आणखी पाच जणांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या ७ झाली आहे. 
 
गडचिरोली जिल्ह्यात २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षात तब्बल १० हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती. त्याप्रकरणी चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे. तर मुख्य आरोपी उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेच व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह १० आरोपी अद्यापही फरार आहेत.
 
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक अशा १७ जणांवर गुन्हे दाखल केले होते. 
 

Related Articles